Numbers 27

सलाफहादाच्या मुलींची विनंती

1मग योसेफाचा मुलगा मनश्शे ह्याच्या कुळातला सलाफहाद हेफेरचा मुलगा होता. हेफर गिलादाचा मुलगा होता. गिलाद माखीरचा मुलगा होता. माखिर मनश्शेचा मुलगा होता. सलाफहादला पाच मुली होत्या. त्यांची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.

2या पाच स्त्रिया दर्शनमंडप प्रवेशद्वारापाशी गेल्या आणि मोशे, याजक एलाजार, पुढारी आणि इस्राएलाच्या मंडळीसमोर जाऊन उभ्या राहिल्या. त्या म्हणाल्या, 3आमचे वडील रानात असताना मरण पावले. ज्या मंडळीने कोरहाच्या समूहाला मिळून परमेश्वराला विरोध केला होता त्यामध्ये तो नव्हता तर तो आपल्याच पापाने मेला. त्याऐवजी त्याच्या स्वतःच्या पापाच्या कारणाने तो मेला.

4त्याला मुलगे नव्हते एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का काढून टाकावे? आमच्या वडिलांच्या भावांमध्ये आम्हाला वतन दे. 5तेव्हा मोशेने परमेश्वरासमोर त्यांचे प्रकरण ठेवले.

6परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, 7सलाफहादाच्या मुलींचे म्हणणे बरोबर आहे. त्यांच्या वडिलांच्या नातेवाईकांबरोबर त्यांना मिळणाऱ्या वतनात त्यांचाही वाटा द्यावा. म्हणून त्यांच्या वडिलांचे वतन त्यांच्या नावे कर. 8इस्राएल लोकांसाठी हा नियम कर: जर एखाद्याला मुलगा नसला आणि तो निपुत्रिक मेला तर त्याचे वतन त्याच्या मुलींना मिळावे.

9जर त्याला मुलीही नसल्या तर त्याचे वतन त्याच्या भावांना मिळावे. 10जर त्याला भाऊही नसला तर त्याचे वतन त्याच्या चुलत्याला द्यावे. 11जर त्याच्या वडिलांना भाऊ नसेल तर त्याचे वतन त्याच्या कुळापैकी जो सर्वात जवळचा नातेवाईक असेल त्याला ते मिळावे. इस्राएल लोकांमध्ये हा कायदा असावा अशी आज्ञा परमेश्वराने मोशेला केली. हा इस्राएली लोकांचा कायदा व्हावा.

मोशे आपल्या पश्चात यहोशवास नेता नेमतो

12परमेश्वर मोशेला म्हणाला, यार्देन नदीच्या पूर्वेकडच्या रानातील अबारीम डोंगरावर तू चढून जा. मी इस्राएल लोकांना जो देश देणार आहे तो तेथून पाहा. 13तो पाहिल्यानंतर तुझा भाऊ अहरोन जसा आपल्या पूर्वजांस जाऊन मिळाला तसा आपल्या पूर्वजांस जाऊन मिळशील. 14त्सीनच्या रानात मंडळीचे भांडण झाले त्यावेळी त्या झऱ्याजवळ त्यांच्यासमोर माझे पावित्र्य प्रगट करावे म्हणून जी आज्ञा होती तिच्याविरूद्ध तुम्ही दोघांनी बंड केले. हे त्सीनच्या रानात कादेश जवळ येथील मरीबा झऱ्याच्याजवळ घडले.

15मोशे परमेश्वराशी बोलला व म्हणाला, 16परमेश्वर सर्व मानवजातीच्या आत्म्यांचा देव याने एका मनुष्याला मंडळीवर नेमून ठेवावे. 17तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल. तो त्यांना बाहेर नेईल व आत आणील म्हणजे परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखी होणार नाही.

18तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव, त्याच्याठायी माझा आत्मा राहतो. 19त्याला याजक एलाजार आणि सर्व मंडळीसमोर उभे करून आणि त्याला त्यांच्या समक्ष आज्ञा कर.

20तू आपला काही अधिकार त्याला दे. याकरिता की, इस्राएलाच्या सर्व मंडळीने त्याची आज्ञा मानावी. 21तो एलाजार याजकापुढे उभा राहील, तो त्याच्यावतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वराला विचारील. त्याने व त्याच्याबरोबर इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्याच्या सांगण्यावरून बाहेर जावे व आत यावे.

22मोशेने परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे केले. त्याने यहोशवाला एलाजार याजकाच्या आणि लोकांच्या पुढे उभे केले. परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने त्याच्यावर हात ठेवले आणि त्याने त्याला नेतृत्व करण्याची आज्ञा दिली.

23

Copyright information for MarULB